बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:32 IST2025-08-09T16:29:42+5:302025-08-09T16:32:34+5:30

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नाते जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला

Sister Muktai sent Rakhi to brother Mauli | बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

आळंदी : रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या तिन्ही देवरुपी संत भावंडांना रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. यंदाही आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर येथून बंधू माऊलींना राखी आली आहे. 
            
तीर्थक्षेत्र आळंदीत शनिवारी (दि.९) पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या समाधीवर श्री संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, सम्राट पाटील, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचारसागर महाराज लाहुडकर, मुक्ताई पालखी सोहळा अश्व मानकरी संदीप महाराज भुसे, प्रतिभा पाटील, मीनाताई पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या हस्ते 'ज्ञानदादा' असे संबोधलेली राखी अर्पण करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे आदिशक्ती मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. 
               
दरम्यान दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला. दिवसभरात पंचवीस हजारांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

Web Title: Sister Muktai sent Rakhi to brother Mauli