धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून युवकाचा खून; चाकणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:27 IST2021-09-06T21:26:47+5:302021-09-06T21:27:33+5:30
खून झालेला रोहित सहानी याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर

धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून युवकाचा खून; चाकणमधील घटना
चाकण : चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. ६ ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित सहानी (वय १८, सध्या रा. चाकण ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याची चाकण पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाकणमधील जय महाराष्ट्र चौक येथे रोहित सहानी व त्याच्या ग्रुपमधील काही जणांचे टोळके एकत्र जमले होते. त्यानंतर दुपारी पावणे एकच्या सुमारास रोहित सहानी व आणखी एक जन एकाच दुचाकीवरून चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत आले. याच ठिकाणी दुपारी १ च्या सुमारास मोठा दगड डोक्यात घालून रोहित याचा खून करण्यात आला. पोलिसांनी काही संशयितांची नावे निष्पन्न केल्याची माहिती समोर येत आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या खूनामागच्या कारणांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचक इप्पर, प्रेरणा कट्टे, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत घटनास्थळीच ठाण मांडून असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. खून झालेला रोहित सहानी याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.