निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:37 IST2025-10-18T18:36:09+5:302025-10-18T18:37:31+5:30
पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु

निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’
पुणे: गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून निलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. कोथरूड परिसरातील पोलिसांनी घेतलेल्या त्याच्या घरझडतीत दोन काडतुसे तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या. या प्रकरणी घायवळविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या घरझडतीत एक ॲम्युनेशन बॉक्स (बंदुकीच्या गोळ्या ठेवण्याचा बॉक्स) देखील आढळून आला आहे. हा बॉक्स रिकामा असला तरी तो बॉक्स निलेश घायवळ पर्यंत कसा पोहोचला याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे.
मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले आहे. सोमवारी (दि. ६) पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीमध्ये त्याच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिन्यात इन्व्हर्टरचा एक लोखंडी बॉक्स होता. पोलिसांनी तो बॉक्स उघडून बघितला असता त्यात इन्व्हर्टर च्या मागे एक लोखंडी बॉक्स आढळला. तो बॉक्स खाली काढून बघितला असता, पिस्तुलाच्या गोळ्या ठेवण्यासाठी बॉक्स असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. त्या बॉक्सवर २०१७ वर्षाचा उल्लेख असून, ५.५६ एमएम असे लिहिलेले आहे.
बॉक्स रिकामा काडतुसं गेले कुठे...?
पोलिसांना बॉक्स मिळाला तेव्हा त्यात एक सत्तूर (मोठा सुरा) पोलिसांना सापडला. त्याव्यरिक्त बॉक्समध्ये एकही काडतूस आढळले नाही. संबंधित बॉक्समध्ये ३०० काडतुसं बसतात. त्यामुळे त्यातील काडतुसं कुठे गेली हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
ॲम्युनेशन फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार..
पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला आहे. याबाबत माहिती विचारण्यात आली आहे. तसेच बॉक्स फॅक्टरीबाहेर कसा आला, कुणाला दिला याचा रेकॉर्ड देखील मागवण्यात आला आहे.