पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:26 IST2021-06-02T10:23:38+5:302021-06-02T10:26:38+5:30

पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता, त्यांना असणारी १० वर्षाची मुलगी झाली अनाथ

Shocking incident in Pune! Husband commits suicide by killing his wife | पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देपती लॉकडाऊन सुरु झाल्यापासून काही कामधंदा करत नव्हता, पिराजीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ते राहत होते

पुणे: चारित्र्याच्या संशयचावरुन पत्नीचा गळा दाबून खुन करुन नंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला. उषा योगेश गायकवाड (वय २८) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश तानाजी गायकवाड (वय ३३, रा. पिराजीनगर, माळवाडी, वडगाव शेरी) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे. ही घटना ३१ मे रोजी रात्री साडेदहा ते १ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

योगेश गायकवाड हा लॉकडाऊन सुरु झाल्यापासून काही कामधंदा करत नव्हता. उषा ही स्वयंपाकाची कामे करीत होती. त्यांना एक १० वर्षाची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून योगेश हा उषा हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. पिराजीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ते रहात होते.

सोमवारी रात्री साडेदहा वाजता ते तिघेही जण टीव्ही पहात होते. त्यावेळी योगेश याने मुलीला तु जाऊन झोप असे सांगितले. त्यानुसार मुलगी शेजारच्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास योगेश याने उषा हिचा गळा दाबून तिचा खुन केला. त्यानंतर त्याने त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता मुलगी उठली व तिने दरवाजा उघडल्यावर तिला हे दृश्य दिसले. हा प्रकार या लहान मुलीने आपल्या चुलत्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली.

सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, सहायक निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. उषा गायकवाड हिचे शवविच्छेदन करण्यात आले. गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचे ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा खुन करुन स्वत: आत्महत्या केल्याने आता त्यांची १० वर्षाची मुलगी अनाथ झाली आहे.

Web Title: Shocking incident in Pune! Husband commits suicide by killing his wife