धक्कादायक घटना! घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर, कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:34 IST2025-02-18T11:32:04+5:302025-02-18T11:34:19+5:30
तरुणाने संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा कॅफे मालकाने उलट तरुणालाच धमकावले

धक्कादायक घटना! घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर, कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा
पुणे: घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मैत्रिणीने १४ फेब्रुवारी रोजी घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका ॲपवर नोंदणी करून विश्रांतवाडी भागातील एका कॅफेतून चाॅकलेट शेक मागवला होता. तरुणी लोहगाव भागात राहायला आहे. चाॅकलेट शेक घेऊन रात्री एक कामगार तरुणीच्या घरी आला. तरुणीने चाॅकलेट शेक घेतला. तिने चाॅकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला, तेव्हा शेकमध्ये मृतावस्थेतील उंदराचे पिलू आढळून आले. या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याची माहिती दिली.
तरुणाने संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा कॅफे मालकाने तरुणाला धमकावले. चाॅकलेट शेक तयार करताना मिक्सरमध्ये उंदराचे पिलू पडले. खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जीविताला धोका होईल, असे कृत्य कॅफे मालकाने केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. विमानतळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय संकेश्वरी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय चंदनशिव यांनी कॅफेला भेट दिली. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २७५, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिस कर्मचारी ए. एस. आदलिंग तपास करत आहेत.