धक्कादायक घटना! चक्क वीज पडल्याच्या आवाजाने ३ महिला बेशुद्ध, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 01:43 PM2024-05-18T13:43:48+5:302024-05-18T13:43:56+5:30

वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु असताना वीज पडल्याच्या आवाजाने तीन महिला बेशुद्ध पडल्या होत्या

Shocking event! 3 women fainted, one died due to the sound of lightning | धक्कादायक घटना! चक्क वीज पडल्याच्या आवाजाने ३ महिला बेशुद्ध, एकीचा मृत्यू

धक्कादायक घटना! चक्क वीज पडल्याच्या आवाजाने ३ महिला बेशुद्ध, एकीचा मृत्यू

उरुळी कांचन : खामगाव टेक (ता. हवेली) येथे शुक्रवारी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज पडल्याच्या आवाजाने तीन महिला बेशुद्ध पडल्या असून त्यातील एकीचा मृत्यू झाला आहे. अंजना बबन शिंदे (वय ६५ रा. शिंदवणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उरुळी कांचन व शिंदवणे येथील ११ महिला शुक्रवारी शेती कामासाठी खामगाव टेक येथे गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास काम संपवून घरी निघाल्या होत्या. परंतु, अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतात आडोशाला थांबल्या. त्या ज्या ठिकाणी थांबल्या होत्या त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक मोठी वीज कडाडली. या विजेच्या आवाजाने अंजना शिंदे यांच्यासह सुनीता महादेव डोंगरे (वय ५६), संध्या गाडेकर (वय ४५, दोघी रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना खाजगी वाहनातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ३ महिलांना तपासल्यानंतर अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, बाकी दोघींना उपचार करून सोडून देण्यात आले. दरम्यान, खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंजना शिंदे यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात त पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shocking event! 3 women fainted, one died due to the sound of lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.