Pune: बोगस नंबरप्लेट लावून विद्यार्थी वाहतुकीचा धक्कादायक प्रकार; चालक, मालकावर ‘आरटीओ’कडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:06 IST2025-12-18T12:05:46+5:302025-12-18T12:06:16+5:30
प्रत्यक्षात वाहनाचा मूळ नोंदणी क्रमांक (एमएच १४ सीडब्ल्यू १३८३), असा असून, तो बदलून (एमएच १४ सीडब्ल्यू ३८४६) हा बोगस क्रमांक लावण्यात आला होता.

Pune: बोगस नंबरप्लेट लावून विद्यार्थी वाहतुकीचा धक्कादायक प्रकार; चालक, मालकावर ‘आरटीओ’कडून गुन्हा दाखल
पुणे: शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला बनावट नंबरप्लेट लावून विद्यार्थी वाहतुकीचा धक्कादायक प्रकार आरटीओच्या पथकाने उघडकीस आणला. बालेवाडीतील दसरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी स्कूलबस चालक आणि मालकावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित बाळासाहेब नानेकर (रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), वाहनमालक तानाजी रजनीकांत शिंदे (वय ४२, रा. औंध गाव, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत आरटीओच्या मोटारवाहन निरीक्षक स्मिता कोले (४६) यांनी फिर्याद दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओचे पथक हद्दीत गस्तीवर होते. बालेवाडी येथे तपासणीदरम्यान विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या (एमएच १४ सीडब्ल्यू ३८४६) या क्रमांकाच्या स्कूल वाहनाला थांबविण्यात आले. तपासणीदरम्यान वाहनावर लावण्यात आलेली नंबरप्लेट ही अन्य वाहनाची असल्याचे उघड झाले.
प्रत्यक्षात वाहनाचा मूळ नोंदणी क्रमांक (एमएच १४ सीडब्ल्यू १३८३), असा असून, तो बदलून बोगस क्रमांक लावण्यात आला होता. आरटीओची कारवाई टाळण्यासाठी जाणूनबुजून नंबरप्लेट बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आरटीओच्या पथकाने स्कूल वाहन ताब्यात घेऊन वाहनचालक आणि मालकावर थेट गुन्हा दाखल केला. त्यानुसार दोघांवर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारवाहन निरीक्षक स्मिता कोले, तृप्ती पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक कांचन आवारे, शुभम पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.