Ayush komkar: आयुष कोमकर खून प्रकरणात शिवम आंंदेकरसह चौघे गजाआड; गुजरात सीमेवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:50 IST2025-09-15T13:49:58+5:302025-09-15T13:50:51+5:30
आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती

Ayush komkar: आयुष कोमकर खून प्रकरणात शिवम आंंदेकरसह चौघे गजाआड; गुजरात सीमेवर पोलिसांची कारवाई
पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्याप पसार असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. गुजरात सीमेवरून अटक करण्यात आलेल्या चौघांची प्रवासी कोठडी मिळवण्यात आली असून, त्यांना सोमवारी (दि. १५) पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (४०) हा अद्याप पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून शनिवारी सायंकाळी अटक केली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना गुजरात सीमेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात एक आरोपी फरार असून, त्याचा शाेध घेण्यात येत आहे. आरोपींची गुजरातमधील स्थानिक न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवण्यात आली आहे. आरोपींनी सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. - निखिल पिंगळे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.