शिवाजीराव सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 19:27 IST2020-01-14T19:27:12+5:302020-01-14T19:27:30+5:30
राजकीय कारणांमुळे पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे युक्तिवादातून पुढे आले, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे.

शिवाजीराव सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे : आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह शिवाजीराव सहकारी बँकेच्या १६ संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करत असल्याचे त्या खऱ्या भासवून ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बँकेच्या व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
तानाजी दत्तू पडवळ असे या व्यवस्थापकाचे नाव असून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव, नऱ्हे रोड) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह बँकेच्या १६ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडवळ याच्यावर पैशांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी होती. राजकीय कारणांमुळे पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे युक्तिवादातून पुढे आले, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. हे प्रकरण गंभीर असून ठेवीदारांच्या हितासाठी अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील सुनील हांडे यांनी केला.