पाण्यासाठी आता जलसमाधी घ्यायची का? मध्यवस्तीसह उपनगरातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:58 PM2021-06-21T15:58:51+5:302021-06-21T17:17:55+5:30

शहरातील मध्यवस्तीत पाणी मिळत नसेल तर उपनगरातील लोकांनी जलसमधीच घ्यायला हवी अशा शब्दात व्यक्त केली नगरसेवकांनी आपली व्यथा

Shiv Sena, NCP corporators attack administration in Pune Municipal Corporation | पाण्यासाठी आता जलसमाधी घ्यायची का? मध्यवस्तीसह उपनगरातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे

पाण्यासाठी आता जलसमाधी घ्यायची का? मध्यवस्तीसह उपनगरातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे : पालिकेचा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून पाणी देण्याची मागणी

पुणे: शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत नाही. अशी तक्रार करीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची सूचनाही नगरसेवकांनी मुख्यसभेत केली. जर मध्यवस्तीत पाणी मिळत नसेल तर उपनगरातील लोकांनी जलसमधीच घ्यायला हवी अशा शब्दात नगरसेवकांनी आपली व्यथा व्यक्त केली. 

धरणामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या उदासीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणी मिळत नाही. याविषयावर शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, राष्ट्रवादीचे गफूर पठाण, बाबुराव चांदेरे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, सचिन दोडके, मनसेचे वसंत मोरे यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. 

पाणी असूनही दिले जात नाही. एक तास सुद्धा पाणी दिले जात नसल्याचे जावळे, धनवडे यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्याचे वेळापत्रक ठरविण्यात येत नाही. कोंढवा आणि हडपसर सारख्या भागातही पाणी देण्यात येत नाही. यापुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये पाण्याचे नियोजन नाही. शेतीचे आवर्तन बंद असल्याने कालव्याला पाणी नाही. कालव्याला पाणी सोडले तर विहिरींना पाणी येईल असे नगरसेवक पठाण, ससाणे व ढोरे म्हणाले. वारजे शिवणे परिसरातील नागरिक भारतातील आहेत. पाकिस्तानातून आलेले नाहीत. पाणी पट्टी घ्या मात्र पाणी समस्या सोडवा असे दोडके म्हणाले.

मोरे म्हणाले, उपनगरातल्या नगरसेवकांनी जलसमाधी घ्यायची का? जिथे माध्यवस्तीत पाणी मिळत नाही तेथे उपनगरांची अवस्था किती वाईट असेल याची कल्पना न केलेली बरी. कात्रज गाव २४ वर्षांपूर्वी पालिकेच्या हद्दीत आले. मात्र, १९९७ पासून आजवर पाणी याच विषयावर पालिकेशी भांडतोय. साठवण क्षमता वाढविण्यात येत आहे मग नियोजन का होत नाही. टाक्या बांधूनही पाणी मिळत नाहीये. भामा आसखेड, खडकवसल्याचे पाणी मुरतेय कुठे? असा सवाल त्यांनी केला. 

प्रशांत जगताप म्हणाले, १९९५ पासून पाण्याचा प्रश्न कायम आहे. पुणे स्मार्ट होत असताना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. एसआरएच्या मोठ्या इमारतींमध्ये हंड्याने पाणी भरावे लागत आहे. लिफ्ट बंद आहेत. मात्र जिन्याने पाणी भरावे लागत आहे. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Shiv Sena, NCP corporators attack administration in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app