भाजपाच्या बॅनरवर झळकले शिवसेनेचे नेते, एमआयएम, काँग्रेस अन् राष्ट्रवादीसुद्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 11:03 PM2021-06-12T23:03:58+5:302021-06-12T23:04:40+5:30

येत्या वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे

Shiv Sena leaders, MIM and Congress-NCP also flashed on the BJP banner in pune | भाजपाच्या बॅनरवर झळकले शिवसेनेचे नेते, एमआयएम, काँग्रेस अन् राष्ट्रवादीसुद्धा

भाजपाच्या बॅनरवर झळकले शिवसेनेचे नेते, एमआयएम, काँग्रेस अन् राष्ट्रवादीसुद्धा

Next
ठळक मुद्देयेत्या वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे

पुणे : असे म्हणतात की पुण्यात होणारे प्रयोग नंतर देशभरात राबविले जातात. मग तो राजकीय सत्ता-समिकरणाचा 'पुणे पॅटर्न' असो की सुरेश कलमाडी यांना एकेकाळी भाजपाने दिलेला पाठींबा असो. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर पालिकेतील पदाधिकारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सलगी असो. पुण्यातल्या 'पॉलिटिकल' घटनांची नेहमीच चर्चा होत आली आहे. आताही शहरात अशीच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शहरात भाजपाने लावलेल्या अभिमान पुण्याचा या बॅनर्सची. कारण चौकाचौकात लागलेल्या या बॅनरवर चक्क राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि चक्क एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. 

येत्या वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलन, पत्रकार परिषदा घेण्यासोबतच सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा आणि विकास कामांचा 'हिशोब' मांडणे सुरू केले आहे. तर, सुस्तवलेल्या काँग्रेसमध्येही प्राण फुंकण्याचे  प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. राज्यातल्या सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेने आपली ताकद एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. 

मागील चार वर्षात अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर विरोधी पक्ष कडाडून टीका करीत आहेत. समान पाणी पुरवठा योजना, जायका प्रकल्प, नदीकाठ सुधारणा प्रकल्प आदी मोठ्या प्रकल्पांमध्ये नसलेली प्रगती यामुळे भाजपावर टीका होत आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात पुन्हा एकदा पुण्यातल्या राजकीय 'सौहार्दा'ची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने शहरात सर्वत्र 'अभिमान पुण्याचा' असे फलक लावले आहेत. या फलकांवर कोविड काळात चांगले काम केलेल्या सामाजिक, राजकीय, वैद्यकीय आदी क्षेत्रातील व्यक्तींची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. भाजपाने लावलेल्या या फलकांवर राष्ट्रवादीचे आण्णा थोरात, एमआयएमचे अंजुम इनामदार, काँग्रेसचे किरण सातव, शिवसेनेने कट्टर कार्यकर्ते जावेद खान आदी राजकीय व्यक्तींचे फोटो आहेत. त्यामुळे भाजपाच्या पोस्टरवर 'नॉन भाजपा' कार्यकर्त्यांचे लागलेले फोटो हा चर्चेचा विषय झाला आहे. 

कोविड काळात सर्वांनीच एकमेकांना साथ देत काम केले आहे. पुण्यातील अनेक संस्था, कार्यकर्त्यांनी या काळात मेहनत घेतली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान आम्ही करीत आहोत. यामध्ये राजकीय लाभ घेण्याचा प्रश्न नाही तर कामाचा सन्मान करण्याचा सत्ताधारी म्हणून आमचा प्रयत्न आहे. 
- गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महापालिका

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena leaders, MIM and Congress-NCP also flashed on the BJP banner in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app