शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:49 IST2025-01-09T16:49:18+5:302025-01-09T16:49:37+5:30

भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

Shiv Sena belongs to Thackeray: Role of corporators who joined BJP | शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

- राजू इनामदार

पुणे :
व्यक्तीकेंद्रीत पक्ष असलेली शिवसेना की राष्ट्रकेंद्रीत असलेला भारतीय जनता पक्ष यामध्ये आम्ही राष्ट्रकेंद्रीत पक्षाची निवड केली असे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उद्धवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सांगितले. महापालिका उमेदवारीबाबत पक्षाचा आदेश मान्य करू असे ते म्हणाले.

उद्धव सेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर व प्राची आल्हाट या ५ माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुष्कर तुळजापूरकर, मंदार बलकवडे, राजाभाऊ शेंडगे यावेळी उपस्थित होते.

आमच्या पूर्वीच्या पक्षावर आम्ही कधीच टीका करणार नाही, मात्र त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले. बाळा ओसवाल म्हणाले, २५ वर्षे आम्ही शिवसेनेत होतो. हिंदुत्वाविषयी मी प्रथमपासून आग्रही आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यावेळीच आम्हाला पटले नव्हते. त्यातच दररोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्यामुळे पक्षाबद्दलची नकारात्मकता वाढतच गेली. पुण्यात पक्षवाढीकडे मुंबईतील नेत्यांचे दुर्लक्ष झाले. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो, मात्र त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. अखेर हा निर्णय घ्यावा लागला. धनवडे यांनीही यावेळी हेच सांगितले. शिवसेनेत असलो तरी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यापासूनच राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे भाजप हा काही आमच्यासाठी नवा पक्ष नाही असे ते म्हणाले.

हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही यावर बोलताना ओसवाल व धनवडे यांनी व्यक्तीकेंद्रीत पक्ष की राष्ट्रकेंद्रीत पक्ष यात आम्ही भाजपची निवड केली असे सांगितले. भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, आता महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करणार? या प्रश्नावर या ५ नगरसेवकांनी आम्ही पक्षादेश प्रमाण मानणारेच आहोत, शिवसेनेत होतो त्यावेळीही तेच केले व आताही तेच करू असे सांगितले.

भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रवेशामुळे नाराजी आहे याकडे लक्ष वेधल्यानंतर सरचिटणीस पुनीत जोशी यांनी मोठ्या पक्षात अशा लहानलहान गोष्टी होतच असतात, त्यामुळे काही फरक पडणार नाही असे उत्तर दिले. पक्षाच्या वरिष्ठ स्तराने हा निर्णय घेतला, पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या निर्णयाबरोबर आहोत असे ते म्हणाले.

Web Title: Shiv Sena belongs to Thackeray: Role of corporators who joined BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.