शिक्रापूर : पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची रस्सीखेच;आरक्षणानंतर स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:42 IST2025-09-26T09:42:14+5:302025-09-26T09:42:42+5:30
पुणे जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी, तिकीट मिळो की न मिळो, माघार घेणार नाही

शिक्रापूर : पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची रस्सीखेच;आरक्षणानंतर स्पर्धा
- धनंजय गावडे
शिक्रापूर : पुणेजिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी, तिकीट मिळो की न मिळो, माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत पक्षांना अधांतरी ठेवून तयारी सुरू केली आहे. गट रचनेत कोरेगाव भीमा गटातील वाढू आपटी व वाजेवाडी गावे पुन्हा पाबळ-केंदूरमध्ये समाविष्ट झाल्याने स्पर्धा अधिकच उग्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि भाजपकडून उमेदवारीची स्पर्धा तापली असून, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे सारे लक्ष लागले आहे.
या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, केंदूरचे माजी सरपंच प्रमोद पऱ्हाड, सतीश थिटे, माजी सभापती सुभाष उमाप, नंदकुमार पिंगळे व सविता बगाटे यांची जोरदार चर्चा आहे. मात्र, उमेदवारी ठरविण्याचे सर्व अधिकार माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे असल्याने त्यांची भूमिका काय असेल, याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. दुसरीकडे, भाजप स्वबळावर लढविणार असल्याच्या चर्चेमुळे माजी सदस्या जयश्री पलांडे, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवानराव शेळके, मारुती शेळके, राजेंद्र रासकर व नंदकुमार गायकवाड यांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये या गटात घवघवीत यश मिळवले असल्याने, जिल्हा परिषदेतही हाच ट्रेंड कायम राहणार का, ही मोठी उत्सुकता आहे. बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी गटात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्याचबरोबर, हिवरे येथील सामुदायिक विवाहाचे आयोजक विकास गायकवाड यांनी मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण संपर्क व विविध कार्यक्रम आयोजित केले असून, दोन्ही राष्ट्रवादी गट किंवा मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी घेण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून फारशी चर्चा नसली, तरी केंदूर येथील विठ्ठलराव शिर्के प्रतिष्ठानचे प्रवर्तक रवींद्र भोसले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे. तर, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार, याकडे सारे लक्ष आहे. कोरेगाव भीमा गटात तयारी करणारे शिवले यांचे गाव पुन्हा पाबळ गटात समाविष्ट झाल्याने त्यांनी येथे ताकद लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन्ही पर्याय त्यांच्यासाठी खुले असून, तिकीटाची वाट न पाहता स्वतंत्र लढत देण्याच्या तयारीत आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांनीही चाचपणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, दिवंगत गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांचे चिरंजीव राजेंद्र थिटे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी काही कार्यकर्ते आग्रही आहेत. शिरूर पंचायत समितीसाठी पाबळ व केंदूर गणातील इच्छुकांनी मात्र सावध भूमिका घेतली असून, 'वेट अँड वॉच' धोरण अवलंबले आहे. आरक्षणानंतर खरी लढत ठरणार असल्याने या गटातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.