‘मैत्रिणीकडे चालली आहे’, 'ती' परतलीच नाही, प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:02 IST2025-12-01T13:58:31+5:302025-12-01T14:02:46+5:30
दोघांमधील प्रेमसंबंधातील कुणकुण तरुणीच्या कुटुंबीयांना लागली होती, कुटुंबीयांनी प्रेमप्रकरणाला विरोध केला होता

‘मैत्रिणीकडे चालली आहे’, 'ती' परतलीच नाही, प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पुणे: प्रेमप्रकरणातून तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. तरुणी प्रियकराच्या येरवडा भागातील घरात मृतावस्थेत सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. प्रियकराने तरुणीचा खून करून तळेगाव दाभाडे परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली. दिव्या निघाटे (२३, रा. लोणीकंद) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे. गणेश शाहूराव काळे (२७, सध्या रा. संगमवाडी, येरवडा, मूळ रा. अशोकनगर, ढगे काॅलनी, बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा मूळचा बीडमधील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात आहे. दिव्या ही लोणकंद परिसरात राहायला आहे. दोघे जण बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात कामाला होते. गणेश रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता, तर दिव्या परिचारिका होती. रुग्णालयात काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांमधील प्रेमसंबंधातील कुणकुण दिव्याच्या कुटुंबीयांना लागली होती. दिव्याच्या कुटुंबीयांनी प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. शनिवारी (दि. २९) दिव्या घरातून बाहेर पडली. ‘मैत्रिणीकडे चालली आहे’, असे तिने कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, दिव्या घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार दिली.
रविवारी सकाळी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक परिसरात गणेशचा मृतदेह सापडला. त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. सुरुवातीला त्याची ओळख पोलिसांना पटली नव्हती. तपासात त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांचे पथक येरवड्यातील संगमवाडी परिसरात असलेल्या गणेशच्या खोलीत गेले. तेव्हा दिव्या मृतावस्थेत सापडल्याचे उघडकीस आले. दिव्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आहेत. दिव्याचा मारहाण करून खून करण्यात आला. त्यानंतर गणेशने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर तिच्या मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल’, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.