शरद पवार मुरब्बी राजकारणी, लपूनछपून राजकारण करत नाहीत - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:25 IST2023-02-13T19:20:10+5:302023-02-13T19:25:39+5:30
देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी विधाने करतात

शरद पवार मुरब्बी राजकारणी, लपूनछपून राजकारण करत नाहीत - अशोक चव्हाण
पुणे/किरण शिंदे : शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. मुरब्बी राजकारणी आहेत. ते जी काही भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. लपूनछपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही विधान केले आहे ते निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या तोंडावरच हा साक्षात्कार कसा होतो, असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विचारला आहे. ते पुण्यात बोलत होते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा स्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता असे ते म्हणाले. इतकच नाही तर महामंडळाच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा केली होती आणि खाते वाटपाबाबतही पवारांशी बोलणे झाले होते असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटा नंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा काँग्रेस जिंकेल अशी शक्यता दिसत आहे. काँग्रेसने प्रचारातही मुसंडी मारली आहे. त्यामुळेच भाजपला अशा प्रकारची दुर्दैवी रणनीती आखण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बाबतीत त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे ते चुकीचे आहे.