लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:47 IST2025-04-04T10:45:05+5:302025-04-04T10:47:45+5:30

जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी

Shameful incident that tarnishes humanity Strict action should be taken against the hospital - Amol Kolhe | लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे

लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कोल्हे म्हणाले, सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं. ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला नाकर्तेपणा उघड करणारी आहे. विशेष म्हणजे पीडित भगिनी ही सत्ताधारी आमदारांशी संबंधित होत्या, त्यांच्यावर उपचार करावेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विनंतीही करण्यात आली होती, तरीही हे "धर्मादाय" रुग्णालय आपल्या असंवेदनशील भूमिकेवर ठाम राहिले. या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी. 

१० लाख भरा 

दीनानाथ रुग्णालयातून महिलेला पैशांअभावी गेटवरूनच परत पाठवण्यात आले. प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला. अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि त्यातच जीव गेला.

Web Title: Shameful incident that tarnishes humanity Strict action should be taken against the hospital - Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.