मार्केटयार्ड परिसरात दहशत पसरवणार्या शाहरुख खानला एमपीडीएखाली केले स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 15:33 IST2021-05-12T15:33:37+5:302021-05-12T15:33:42+5:30
मागील ६ वर्षात साथीदार आणि त्याच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल

मार्केटयार्ड परिसरात दहशत पसरवणार्या शाहरुख खानला एमपीडीएखाली केले स्थानबद्ध
पुणे :मार्केटयार्ड परिसरात दहशत पसरविणार्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान (वय २६, रा. कोंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शाहरुख खान याने त्यांच्या साथीदारांसह मार्केटयार्ड परिसरात तलवार, चॉपर, लाकडी बांबु यासारखी हत्यारे बाळगून अपहरण, दुखापत करणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे गुन्हे केले आहेत. मागील ६ वर्षात त्यांच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यापासून जिवीताचा व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीने नागरिक उघडपणे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. सध्या तो कोंढवा येथे राहायला गेला असून तेथेही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरु होती.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे व पोलीस निरीक्षक सुविता ढमढेरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन शाहरुख खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक पावले उचलली असून गेल्या ७ महिन्यात २० सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.