ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक डाॅ. आनंद करंदीकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:44 IST2025-11-19T12:43:56+5:302025-11-19T12:44:49+5:30
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं. दा. करंदीकर यांचा मुलगा, पण हे नातं आनंद करंदीकर यांनी कधी जाहीर होऊ दिलं नाही

ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक डाॅ. आनंद करंदीकर यांचे निधन
पुणे : मार्केटिंग आणि इकॉनॉमेट्रिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (METRIC) संस्थेचे प्रवर्तक आणि २५ वर्षे अध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक डाॅ. आनंद करंदीकर (वय ७८) यांचे मंगळवारी (दि. १८) सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात सहचारी सरिता आव्हाड आहेत.
मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास वाढल्याने ऑक्सिजन इनरीचर लावावा लागत हाेता. अशा स्थितीतही शेवटच्या क्षणापर्यंत स्वत:ला सामाजिक कामात वाहून घेतले. मृत्यूच्या काही तास आधी भाेसरी येथे कायनेटिक कंपनीच्या बैठकीस हजेरी लावून मार्गदर्शन केले हाेते. आदल्याच दिवशी अर्थात साेमवारी दुपारी एमकेसीएल येथे विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. संशाेधक विद्यार्थ्यांची घटती संख्या यावर चिंतन करण्यासाठी अभ्यासक, कार्यकर्ते, विचारवंत यांची बैठक घेतली हाेती. त्यात सविस्तर आकडेवारी मांडून चर्चा खुली केली हाेती.
डाॅ. करंदीकर यांनी आयआयटी मुंबई येथून बी. टेक, त्यानंतर आयआयएम कलकत्ता येथून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर पीएच. डी. केली. तरुण वयात त्यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे युवक क्रांती दलाचे काम केले. ‘नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवावे’ यावर अभ्यास केला. बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना दोन दोन आठवड्यांचा कारावासदेखील झाला. सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी विषयांवर विपूल लेखन केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं. दा. करंदीकर यांचा मुलगा, पण हे नातं कधी जाहीर होऊ दिलं नाही. बराच काळ युक्रांदमध्ये सक्रिय कार्य केले. या अनुभवांविषयी ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’ हे पुस्तक लिहिले आहे. सायंकाळी घरात पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वीच व्यक्त केलेल्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयाला दान केला जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी सकाळी ९ ते १२ ससून येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.