राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने खून झालेल्या कंपनीतील सुरक्षेचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:22 IST2025-01-16T12:20:17+5:302025-01-16T12:22:51+5:30
- राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने घेतली पोलिस आयुक्तांची भेट - येरवडा येथील खून प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्य शोधन समितीने खून झालेल्या कंपनीतील सुरक्षेचा घेतला आढावा
पुणे : येरवडा येथील बीपीओ कंपनी डब्ल्यू. एन. एस. कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा कंपनीच्या पार्किंगमध्ये खून केल्याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी समितीने जिल्हा प्रशासन व संबंधित व्यक्तींशी संवाद साधला.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय सूचविण्यासाठी एक तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. या समितीत मीनाक्षी नेगी, डॉ. बी. के. सिन्हा आणि आर. श्रीलेखा यांचा समावेश आहे. समिती १४ जानेवारी रोजी पुण्यात आली आणि घटनेशी संबंधित महत्त्वाची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले. समितीने पोलिस आयुक्तांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. योवळी पोलिसांनी समितीला गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेला तपास व आरोपीच्या अटकेबद्दल माहिती दिली. आरोपीला घटनास्थळीच अटक केल्याचे त्यांनी समितीला स्पष्ट केले. यावेळी समितीने पीडितेच्या बहिणी व वडिलांशीदेखील संपर्क साधला. राष्ट्रीय महिला आयोगाकडून तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल, याची त्यांना हमी देण्यात आली. समितीने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशीहीदेखील चर्चा केली. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत पुरवणे आणि त्यांच्या सुरक्षेची खात्री करणे याबाबत समितीने चर्चा केली.
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
अशा घटनांचे संवेदनशील मीडिया कव्हरेज आवश्यक असून पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचा व सन्मानाचा विचार करावा. यावर समितीने विशेष भर दिला. समितीने घटनेच्या ठिकाणी भेट देऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अंतर्गत प्रक्रिया आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर चर्चा केली. राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांना प्राधान्य देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.