Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:55 IST2025-12-08T13:53:38+5:302025-12-08T13:55:07+5:30
Pune Navale Bridge Accident: सुदैवाने अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे, तसेच स्कुल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे

Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी
पुणे : पुण्यातील नवले पुलावर सकाळी स्कूल बसचालकाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला आहे. स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
नवले पुलावर मागील महिन्यात झालेल्या अपघातात ८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातच हा अपघात झाला होता. आता पुन्हा याच ठिकाणी कार आणि बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. वारंवार या पुलावर अपघात होत असल्याने नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे. प्रशासनकडूनही कडक कायदे, नियम अटी राबवण्यात येत आहेत. परंतु अपघात थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.
नवले पुलावरील तीव्र उतारामुळे असंख्य अपघात होऊ लागले आहेत. वेगमर्यादा नियंत्रणात ठेवण्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु काही वाहनांकडून वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही. अशावेळी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतो. काही घटनांमध्ये ब्रेक फेल होऊन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आता नवले पुलावरील अपघात पूर्णपणे थांबण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.