सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; दिग्गजांसह १७ कलाकारांचे प्रथमच सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:21 IST2025-11-24T19:19:56+5:302025-11-24T19:21:04+5:30
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे सवाई गंधर्व भीमसेन संपन्न होणार आहे

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; दिग्गजांसह १७ कलाकारांचे प्रथमच सादरीकरण
पुणे : सूर, लय, ताल यांच्या अद्वितीय संगमातून साकार झालेल्या ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या 'स्वरयज्ञा'स १० ते १४ डिसेंबर दरम्यान प्रारंभ होणार आहे. भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसह पं. उल्हास कशाळकर, पं. तेजेंद्र नारायण मजुमदार, पद्मा देशपांडे, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या कलाविष्कारांसह तब्बल १७ कलाकारांचे सादरीकरण प्रथमच महोत्सवात अनुभवण्याची संधी मिळणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे सवाई गंधर्व भीमसेन संपन्न होणार आहे. महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
बुधवार दि. १० डिसेंबर दुपारी ३ वाजता महोत्सवाची सुरुवात दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहनाईवादनाने होईल. किराणा घराण्याच्या गायिका असलेल्या डॉ चेतना पाठक , बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र- शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन तसेच भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य असलेले पं शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव- दे-हास हे यानंतर सतार व चेलो असे सहवादन होणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.
दुस-या दिवशी गुरुवार दि. ११ डिसेंबर सायं ४ वाजता पहिल्या सत्राची सुरुवात शास्त्रीय गायक, संगीतकार असलेल्या हृषिकेश बडवे यांच्या गायनाने होईल. यानंतर प्रतिभावान सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे सरोदवादन व सवाई गंधर्व यांच्या नातसून विदुषी पद्मा देशपांडे यांचे गायन सादर होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सॅक्सोफोनवादक जॉर्ज ब्रूक्स आणि पं रविशंकर यांचे शिष्य असलेल्या पं. कृष्णमोहन भट (सतार) यांचे सहवादन सादर होऊन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.
शुक्रवार दि. १२ डिसेंबर तिसऱ्या दिवसाची सुरुवात उदयोन्मुख संतूरवादक सत्येंद्र सोलंकी यांच्या वादनाने होईल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन, इमदादखानी घराण्याचे कलाकार असलेले उस्ताद शुजात हुसेन खान यानंतर सतारवादन सादर करतील. जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन होईल.
शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी बंगळुरूमधील तरुण, प्रतिभावान गायक सिद्धार्थ बेलमण्णु , पुण्याच्या भेंडीबाजार घराण्याच्या अग्रगण्य गायिका अनुराधा कुबेर यांचे गायन होईल. . मैहर घराण्याचे आघाडीचे बासरीवाद पं. रूपक कुलकर्णी हे यानंतर बासरीवादन, डॉ. भरत बलवल्ली यांचे गायन आणि विदुषी कला रामनाथ (व्हायोलिन) आणि विदुषी डॉ. जयंती कुमरेश (विचित्रवीणा) या सहवादन सादर करतील. महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप आसाममधील प्रसिद्ध कथक नृत्यांगना मेघरंजनी मेधी यांच्या नृत्यप्रस्तुतीने होईल.
रविवार दि. १४ डिसेंबर रोजी पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट व किराणा आणि ग्वाल्हेर परंपरेतील गायिका श्रुति विश्वकर्मा मराठे , प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचे गायन होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिनवादक डॉ. एल. शंकर यांचे व्हायोलिन वादन व ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन होईल. तर ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या कलाकारांची प्रस्तुती असलेल्या ‘अर्घ्य’ या कार्यक्रमाने होईल. यामध्ये पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आणि विराज जोशी हे किराणा घराण्याचे कलाकार गायनसेवा सादर करतील.
महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी कलाकार
लोकेश आनंद. डॉ. चेतना पाठक, शुभेंद्र राव, सास्कीया राव - दे-हास, ऋषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, जॉर्ज ब्रूक्स, पं. कृष्णमोहन भट, सत्येंद्र सोलंकी, सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी, डॉ. भरत बलवल्ली, मेघरंजनी मेधी, श्रुती मराठे, अनिरुद्ध ऐताळ, डॉ. एल शंकर