Satish Wagh Case : मोहिनीचा खतरनाक प्लॅन; ५ लाखांची सुपारी ठरली, अक्षयने मित्रांची साथ घेत असा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:02 IST2024-12-27T14:01:01+5:302024-12-27T14:02:28+5:30
अक्षय जावळकर जेव्हा मोहिनी यांच्या घरात भाड्याने राहायचा तेव्हा तो फक्त नऊ वर्षाचा होता.

Satish Wagh Case : मोहिनीचा खतरनाक प्लॅन; ५ लाखांची सुपारी ठरली, अक्षयने मित्रांची साथ घेत असा रचला कट
किरण शिंदे
पुणे - पुण्यातील सतीश वाघ खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. सतीश वाघ खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हीच सूत्रधार असल्याचं समोर आल. मोहिनी वाघ हिचे शेजारीच राहणाऱ्या अक्षय जावळकर या 32 वर्षाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. सतीश वाघ यांना हे समजल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. आणि त्यामुळेच मोहिनी हिने प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने सतीश वाघ यांचा अडसर दूर केला.
४८ वर्षाची मोहिनी आणि ३२ वर्षाचा अक्षय या दोघांमध्ये मागील पंधरा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अक्षय जावळकर जेव्हा मोहिनी यांच्या घरात भाड्याने राहायचा तेव्हा तो फक्त नऊ वर्षाचा होता. मात्र जेव्हा अक्षय २१ वर्षाचा झाला तेव्हा मोहिनी आणि अक्षय दोघात अनैतिक संबंध आले. ते आतापर्यंत सुरू होते. ५५ वर्ष वय असलेल्या सतीश वाघ यांना जेव्हा या दोघांविषयी समजले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण अक्षय जावळकर याला सतीश वाघ यांनी आसरा दिला होता. मागील कित्येक वर्ष तो त्यांच्या घरात भाड्याने राहत होता. अक्षय आणि मोहिनी यांचा मुलगा एकाच वयाचा त्यामुळे ते एकमेकांचे मित्रही होते. मात्र मित्र म्हणून घरात आलेल्या अक्षयचं मोहिनीसोबत सुत जुळलं.
याच कारणावरून सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्यात सतत भांडणं व्हायची. सतीश वाघ मोहिनीला मारहाण करायचे घर खर्चासाठी पैसे देताना हात आखडता घ्यायचे आणि इथूनच वाघ दांपत्यात आणखी बिनसत गेलं. मारहाण करणाऱ्या आणि पैसे न देणाऱ्या नवऱ्याला कायमचा संपवायचंच असा पण मोहिनीने केला. यासाठी मागील सहा महिन्यांपासून ती संधीच्या शोधात होती. अक्षयला खुनाची सुपारी देण्यापूर्वीच मोहिनीने ओळखीतल्या आणखी एकाला सतीश वाघ यांचा खून करणार का म्हणून विचारणा केली होती. मात्र त्या व्यक्तीने नकार दिल्याने पहिला प्लॅन फसला.
त्यानंतर मात्र बदल्याच्या भावनेने दुमसत असलेल्या मोहिनीने प्रियकर असलेल्या अक्षय जावळकर यालाच मदतीला घेतलं.५ लाखाची सुपारी ठरली. अक्षयने ओळखीतल्याच काही मित्रांना या कामासाठी सामील करून घेतलं. आणि ९ डिसेंबर रोजी मोहिनी आणि अक्षय यांनी ठरवलेला कट पूर्णत्वास नेला. अपहरण करून सतीश वाघ यांचा अतिशय निर्घृणपणे खून केला. खून झाल्यानंतर पोलीस जेव्हा वाघ यांच्या घरी तपासासाठी गेले तेव्हा मोहिनी वाघ ही मुलांसोबत ओक्साबोक्सी रडत होती. फार दुःख झाल्याचं आपल्याला भासवत होती. पतीच्या मृत्यूमुळे दुःख झाल्याचं नाटकच तिने उभं केलं होतं, मात्र म्हणतात ना खोटं कधी ना कधी पकडलं जातच. तसंच काहीसं इथं घडलं.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एक खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती मिळाली. मोहिनी वाघ यांच्या जवळच्याच एका व्यक्तीने पोलिसांना अशी टीप दिली ज्याने पोलिसांचे काम आणखी सोपं झालं. मोहिनी आणि अक्षय यांच्यात मागील अकरा वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचं त्या व्यक्तीने पोलिसांना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं. आणि हीच टीप पोलिसांसाठी महत्त्वाची ठरली.
दरम्यान इकडे सतीश वाघ यांच्या खुनानंतर अक्षय जावळकर हा देखील गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तांत्रिक विश्लेषण गायब असलेला अक्षय आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण खुनाला वाचा फुटली. अक्षयने शेवटी मोहिनी वाघ तिच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली दिली.