पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावच्या सतीश शिंदे यांनी केला,'एव्हरेस्ट सर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:02 IST2025-04-19T19:02:10+5:302025-04-19T19:02:41+5:30
सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५३६४ मीटर व १७५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले.

पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावच्या सतीश शिंदे यांनी केला,'एव्हरेस्ट सर'
गराडे : पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावचे माजी सरपंच सतीश मधुकर शिंदे यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केला. एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गापैकी एक आहे. अनेक गिर्यारोहकांना एव्हरेस्ट ट्रेक करण्याची स्वप्न असते.
सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५३६४ मीटर व १७५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले. अंदाजे १५० किलोमीटर अपडाउन करत १४ दिवसांचा वेळ हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी लागला. १४ अंश सेल्सिअस या ट्रेकमध्ये उंची वाढत जाते. हवामानाची जुळवून घेणे या ट्रेकमध्ये खूप महत्त्वाचे असते, तर पाच ते दहा मिनिटांनी हवामान बदलत असते. उंची वाढेल तसे मळमळ डोकेदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या येतात. अशा सर्व खडतर समस्यांना पार करत हा ट्रेक त्यांनी पूर्ण केला.
यासाठी गेल्या एक वर्षापासून घेतलेली मेहनत व जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण करून त्यांनी पुरंदरचे नाव जागतिक पातळीवरील पोहोचवले. सतीश शिंदे यांना जिम, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग फिटनेसची आवड असल्यामुळे तसेच गेल्या एक वर्षापासून सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन यामध्ये घाटवाटा व गड किल्ल्यांचे ट्रेकिंग करून सराव करता आला.
कमी ऑक्सिजनमध्ये शारीरिक क्षमता टिकून राहण्यासाठी श्वसनाचे व्यायाम केले. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारे पुरंदरमधील सतीश शिंदे हे पहिलेच गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी सात समीट केलेले शरद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.