‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’; पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकरी हिरमुसले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:58 PM2021-07-09T21:58:44+5:302021-07-09T22:00:28+5:30

तिथीनुसार शुक्रवारी नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर माऊलींच्या चल पादुकांना स्नान घातले जाते.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremoney cancellation due to corona | ‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’; पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकरी हिरमुसले

‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’; पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकरी हिरमुसले

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संकट टळू दे; माऊलींची वारी पुन्हा सुरू होऊ दे; महिलांनी भरली नीरामाईची ओटी 

नीरा : नीरा भिवरा पडता दृष्टी । स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैकुंठप्राप्ती । ऐसे परमेष्ठी बोलिला ।।
शेकडो वर्षांची परंपरा असलेली माऊलींची वारी गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. त्यामुळे माऊलींच्या वारीचा मार्ग आज सुना सुना झाला होता. नीरेतील नागरिक सकाळपासूनच नीरा नदीवरील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन पुलावरून येणाऱ्या माऊलींच्या सोहळ्याकडे टक लावून बसले होते. पण ‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’ असे म्हणत हिरमुसल्या चेहऱ्याने त्यांना घरी परतावे लागले.

वर्षातून दोन वेळा संतांच्या पालख्या पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात. यादरम्यान पालखी मार्गावरील भाविक भक्तांना संतांच्या चलपादुकांचे दर्शन होत असते. या दर्शनाने वर्षभराची ऊर्जा मिळत असते. गेली दोन वर्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर जात नाही. त्यामुळे पालखी मार्गावरील लोकांमध्ये नैराश्य आहे.

पुरंदर तालुक्यातील नयनरम्य दृश्य नागमोडी वळणाचा दिवेघाट, सासवड पालखीतळावर स्वागत, थोरले बंधू सोपानकाकांची भेट, शिवरीच्या यमाईदेवीची भेट, जेजुरीत भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करत स्वागत, दौंडज खिंडीतील सकाळची न्याहरी, रामायणकार वाल्मीकींच्या गावात खांद्यावरून पालखी व भव्य पालखीतळावरील समाज आरती व पुणे जिल्ह्यातील शेवटी नीरा नदीच्या पवित्र तीर्थात शाही स्नान अशी पर्वणी या पाच दिवसांत असते. सलग दोन वर्षे या पर्वणीला पुरंदरकर मुकल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार सुभाष महाराज जाधव यांनी व्यक्त केली.

तिथीनुसार शुक्रवारी नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर माऊलींच्या चल पादुकांना स्नान घातले जाते. सोहळा रद्द झाल्याने काल गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा नदीचे पवित्र तीर्थ आळंदी देवस्थान घेऊन गेले होते. याच तीर्थाने शुक्रवारी पहाटे माऊलींच्या चलपादुकांना अभिषेक घालण्यात आला असल्याचे पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रमुख सूर्यकांत भिसे यांनी सांगितले.

 

पूर्वी माऊलींचा पालखी सोहळा पुणे-शिरवळ मार्गाने लोणंदला येत होता. त्याकाळी नीरा गावातून सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी नदीवर पूल नव्हता. सन १९२७ साली ब्रिटिश सरकारमध्ये अभियंता असलेल्या वाल्हा गावचे कृष्णा मांडके यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी नीरा नदीवर स्वखर्चाने दगडी पूल (जुना पूल) बांधला. अभियंता मांडकेंच्या इच्छेखातर माउलींच्या सोहळ्यादरम्यान वाल्हे गावच्या शिवेवरून माऊलींची पालखी रथातून काढत मांडके कुटुंबीय खांद्यावरून गावातून मिरवत, रेल्वे स्थानकाशेजारील पालखीतळावर ठेवत. ही परंपरा सन २०१५ पासून खंडित करण्यात आल्याने वाल्हेकर ग्रामस्थही नाराज आहेत.

दरवर्षी माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मंद गार वारा अंगावर घेत, नगारखान्याची बैलगाडी, दोन अश्व, टाळकरी, झेंडेधारी, भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी माऊलींच्या रथापुढे व मागे मार्गस्थ होत असत. पैलतीरावर हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ आरफळकर आणि सोहळाप्रमुखांच्या हातात विश्वस्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुका देण्यात येतात व माऊली माऊलीच्या जयघोषात पादुकांचे शाही स्नान होत असते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा उभा असतो, तो दत्तघाट व नदी पूल आज सुना सुना दिसत होता. 

-----

कोरोना संकट टळू दे; माऊलींची वारी पुन्हा सुरू होऊ दे; महिलांनी भरली नीरामाईची ओटी 

नीरा : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शासनाने आषाढी वारीतील पालखी सोहळ्यांना जरी परवानगी नाकारली असली तरी पालखी सोहळ्यादरम्यान होणारे विधी स्थानिक लोक प्रतीकात्मकरीत्या साजरे करत आहेत. तिथीनुसार शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेली नीरा नदीतील स्नान होणार होते. ते पाडेगाव येथील सांप्रदायिक मंडळाने प्रतीकात्मक पादुकास्नान तर नीरेतील महिलांनी नीरामाईची ओटी भरून नदीत पुष्प अर्पण करत जगावरचे हे कोरोना संकट लवकर टळू दे व माऊलींची वारी पुन्हा जोमात सुरू होऊ दे, असे साकडे घातले.

माऊलींचा पालखी सोहळा दर वर्षी आजच्याच दिवशी नीरास्नानासाठी येत असतो. यादरम्यान नीरेच्या महिला नदीची ओटी भरतात. आजही नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी नीरा नदीची खणा-नारळाने ओटी भरली. या वेळी ग्रामपंचायतीच्या सदस्य राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, स्मिता काकडे, वर्षा जेधे यांसह नीरेतील महिलांनी नीरा नदीत पुष्प वाहून माऊलींचा पालखी सोहळा पुढच्या वर्षी तरी नीरा नदीवर येऊ दे, अशी प्रार्थना केली.

नीरा नदीच्या पैलतीरावरील पाडेगाव येथील संप्रदाय क्षेत्रातील लोकांनी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास प्रतीकात्मक माऊलींच्या पादुका घेऊन आले. विधिवत या पादुकांना नीरा नदीच्या तीरी असलेल्या प्रसिद्ध दत्तमंदिर शेजारील घाटावर माऊली माऊलीच्या गजरात स्नान घालण्यात आले. त्यानंतर दत्त मंदिराच्या सभागृहात आरती करत पुंडलिक वर देव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, असे म्हणत टाळ्या वाजवण्यात आल्या.

Web Title: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremoney cancellation due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.