जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:35 IST2025-05-14T11:33:18+5:302025-05-14T11:35:39+5:30

आयुष्यातील चढ-उतार – या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Salute to perseverance! Priyanka Kamble passed her 10th standard exam by collecting garbage… | जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

-किरण शिंदे

पुणे:
“शिक्षणाला वयाचं बंधन नसतं” हे वाक्य फक्त म्हणायला सोपं आहे, पण ते खरं करून दाखवलंय पुण्यातील कात्रज परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी. घराघरातून कचरा उचलण्याचं कष्टाचं काम, मुलाची जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार – या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेत 47.60 टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन येथे त्यांनी शिक्षण घेतलं. या शाळेचा यंदाचा निकाल 90 टक्के लागला असून, एकूण 10 विद्यार्थिनींपैकी 9 उत्तीर्ण झाल्या आहेत.

प्रियंका कांबळे यांनी शिक्षणासाठी घेतलेली मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे. सकाळी लवकर उठून कात्रज परिसरातील घराघरातून कचरा गोळा करायचा, त्यानंतर मुलाला शाळेत सोडून स्वतः शाळेत जायचं – हा त्यांचा दररोजचा दिनक्रम. परीक्षा असताना देखील कामावर जाऊनच परीक्षा दिल्या. त्यांच्या आईने या प्रवासात त्यांना मोठा आधार दिला, असं त्यांनी सांगितलं.

लहानपणी काही कारणांमुळे शिक्षण थांबलं होतं. मात्र मोठं होत असताना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं आणि पुन्हा एकदा पुस्तकं हातात घेतली. शिक्षणासाठी त्यांनी श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूलमध्ये आठवीपासून प्रवेश घेतला आणि कित्येक वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा अभ्यास सुरू केला.

प्रियंका सांगतात, “मी आणि नवऱ्यामध्ये मतभेद झाल्यामुळे मी मुलासह आईकडे राहायला आले. जीवनात एक वळण असं येतं की सगळं बदलून जातं. माझ्याही बाबतीत असंच झालं. त्यानंतर वाटलं की आता आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे उमजल्यावर मी पुन्हा शिक्षण घ्यायचं ठरवलं. आज दहावीचा निकाल लागल्यावर मनस्वी आनंद वाटतो आहे.”

या शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम खोमणे यांनीही प्रियंका यांचं विशेष कौतुक केलं. “ही शाळा म्हणजे शिक्षणाची दुसरी संधी घेणाऱ्या महिलांसाठी एक आशेचा किरण आहे. आमच्या शाळेत ५ वी ते १० वी पर्यंतच्या प्रौढ विद्यार्थिनी शासनमान्य अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेतात. १० वी उत्तीर्ण झाल्यावर अनेक महिला पुढे व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. प्रियंका यांचं हे यश संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद आहे,” असं त्यांनी सांगितलं.

प्रियंका कांबळे यांचं हे यश म्हणजे केवळ गुणांपुरतं मर्यादित नाही, तर हे आहे जिद्दीचं, मेहनतीचं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या आत्मविश्वासाचं प्रतीक. त्यांच्या या प्रवासातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल आणि त्याही शिक्षणाकडे नव्याने पाहू लागतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Salute to perseverance! Priyanka Kamble passed her 10th standard exam by collecting garbage…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.