उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:50 IST2025-11-08T17:50:05+5:302025-11-08T17:50:39+5:30
राजीनाम्याच्या मागणीवर मी ठाम असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत पुरावे देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम
पुणे : प्रसार माध्यमांसमोर व समाज माध्यमामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने प्रवक्त्या व माजी नगरसेविका रुपाली पाटील - ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी शनिवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतरही त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असतानाही रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा चाकणकर यांना मुदतवाढ देण्यात आल्याने दोघींमधील वाद आणखी भडकला. फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे खुलासे केले. यावरून रुपाली पाटील यांनी माध्यमांसमोर व समाज माध्यमात चाकणकर यांच्यावर तिखट शब्दात टीका करत आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर चाकणकर यांनी कट रचून आपल्यावर व घरच्यांवर गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचाही आरोप केला होता.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईत घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नाव न घेता दोन महिला नेत्यांच्या वादावर टिप्पणी केली होती. त्यानंतर पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी रुपाली पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी शिस्तभंगाची नोटीस बजावली. या नोटीसद्वारे चाकणकर यांच्यावर केलेल्या आरोपाचा सात दिवसात खुलासा देण्याच्या सूचना केल्या आहे. या नोटीसनंतर रुपाली पाटील यांनी शनिवारी अजित पवार यांची पुण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दुसरीकडे रुपाली पाटील आणि त्यांच्या कुटूंबियांनी गेल्या आठवड्यात मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केलेल्या माधवी खंडाळकर यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले.
खुलासा पत्रात सर्व पुरावे देणार
पक्षाने नोटीस नाही तर खुलासा पत्र दिले आहे. मी कायदेशीर खुलासा आणि पत्राला उत्तर देणार आहे. ज्या माधवी खंडाळकर यांनी मारहाण झाल्याची खोटी तक्रार दिली, ती कोणाच्या सांगण्यावरुन दिली, याचा तपास होणे गरजेचे आहे. खंडाळकर यांनी कोणाला कॉल केले याचे तांत्रिक विश्लेषण (सीडीआर) तपासण्याची विनंती पोलिस आयुक्तांकडे केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. आयोग वेगळा आणि पक्ष वेगळा आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर मी ठाम असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत पुरावे देणार असल्याचे रुपाली पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.