पुणे : राज्यघटनेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरकत घेणे म्हणजे देशाची हजारो वर्षांची सामाजिक वीण विस्कटून टाकणेच आहे, अशी टीका काँग्रेसने केली. देशाला धर्मांधतेचा दावणीला बांधणारे हे छुपे विचार सोडा किंवा ते उघडपणे देशवासीयांसमोर आणून त्यांना सामाेरे जा असा सल्लाही काँग्रेसने दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी राज्यघटनेतील या दोन शब्दांवर हरकत घेतली होती व ते राज्यघटनेत नंतर टाकण्यात आले, त्याचा विचार व्हायला हवा असे मत व्यक्त केले होते. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी यावर बोलताना सांगितले की काँग्रेसच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. हा संघाचा कृतघ्नपणा असल्याचेच मत बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केले. संघाची विचारसरणी देशात सत्तेवर आली ती देशातील विविध धर्मियांची मते घेऊनच आली आहे. असे असताना देश एका विशिष्ट धर्माचा असल्याचे बोलणे म्हणजे देशातील हिंदू सोडून अन्य धर्मियांबाबत कृतघ्नता दाखवणेच आहे. किंवा मग या संकुचित विचारसरणीतून आलेले न्यूनगंडही त्यामागे असू शकतो.या आधीही देशात काँग्रेसेतर सरकारे आली आहेत, मात्र त्यांच्याकडून कधीही या दोन शब्दांवर हरकत घेतली गेली नाही किंवा ते काढण्याची मागणीही झाली नाही. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत सुस्पष्ट शब्दांमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. तरीही वारंवार या दोन शब्दांबाबत भाष्य करून संघ परिवार विनाकारण देशात सामाजिक, धार्मिक तणाव निर्माण करत आहे, धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आता भारतीय जनतेच्या चांगलेच लक्षात येत चालले आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. असे करण्यापेक्षा संघाने व त्यांची विचारसरणी मानणाऱ्या केंद्र सरकारने संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी व उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे सल्लाही त्यांनी दिला.
समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:55 IST