रोहित पवारांचा अमित शहांना टोला, सांगितलं पुण्यात प्रचार न करण्याचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:38 AM2023-02-20T09:38:36+5:302023-02-20T09:41:12+5:30

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहांच्या दौऱ्यावर भाष्य करताना पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांच्या प्रचारावरही भाष्य केलं.

Rohit Pawar taunts Amit Shah, tells 'political reason' for not campaigning in Pune | रोहित पवारांचा अमित शहांना टोला, सांगितलं पुण्यात प्रचार न करण्याचं राज'कारण'

रोहित पवारांचा अमित शहांना टोला, सांगितलं पुण्यात प्रचार न करण्याचं राज'कारण'

googlenewsNext

पुणे - पुण्यातील कसबा पेठ विधानसभा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभांमधून भाजपवर निशाणा साधला आहे. तर, भाजप नेतेही जोशाने प्रचारात आघाडी घेत आहेत. दरम्यान, आपल्या २ दिवसीय पुणे दौऱ्यात देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार न केल्याने आता आमदार रोहित पवार यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहांच्या दौऱ्यावर भाष्य करताना पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांच्या प्रचारावरही भाष्य केलं. यावेळी, अमित शहांनी येथील भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार का केला नाही, यामागचं राजकारणच पवार यांनी सांगितलंय. ''अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य 'निकाल' त्यांनीही हेरला असावा!'', अशी टीका रोहित पवार यांनी केलीय. 

अमित शहा पुणे दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील आंबेगाव येथे साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण त्यांच्याहस्ते शिवजयंती दिनी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, प्रवीण दबडगाव, जगदीश कदम उपस्थित होते.

गिरीष बापट प्रचाराच्या मैदानात, अजित पवारांचा टोला

पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्याचे पाहायला मिळत आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप खासदार गिरीश बापट हे थेट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र असं असताना देखील पक्षासाठी ते आज व्हिलचेअरवर बसून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. तर काँग्रेसनेही या मतदारसंघात जोर लावला आहे. तर, बापट यांना प्रचारात उतरवल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या विधानपरिषद मतदानाचा उल्लेख करत बापट यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तसेच, भाजपचं हे राजकारण योग्य नसल्याचंही म्हटलं. 

Web Title: Rohit Pawar taunts Amit Shah, tells 'political reason' for not campaigning in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.