Rohini Khadse: प्रांजल खेवलकर खराडी पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:13 IST2025-10-07T10:11:46+5:302025-10-07T10:13:30+5:30
प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे

Rohini Khadse: प्रांजल खेवलकर खराडी पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला
पुणे : खराडी येथील पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांचा सोमवारी गुन्हे शाखेने जबाब नोंदवला. गुन्हे शाखेकडून रोहिणी खडसे यांची चौकशीही करण्यात आली.
खराडीतील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ जुलै रोजी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद. सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलिग्रॅम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाईल, सुगंधी तंबाखू, दोन कार, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात डाॅ. खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता.
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कोकेन आणि गांजा सदृश अमली पदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. डाॅ. खेवलकर यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळेने याबाबतचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना दिला. या अहवालात डाॅ. खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे.
खराडी पार्टी प्रकरणात डाॅ. खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांचा सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यात आला. त्याअनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात आली. या वेळी ॲड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते. खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. तपासाच्या अनुषंगाने चौकशी करून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.