Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:56 IST2025-09-25T18:54:18+5:302025-09-25T18:56:19+5:30
पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २७ जुलै रोजी पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती. प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. आता त्यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडीतील स्टे बर्ड हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज पार्टी करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हा या पार्टीचा आयोजक असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. तेथे ५ पुरुष आणि २ महिला रेव्ह पार्टी करताना आढळले. त्यात दारू, हुक्का यासह अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले. यावेळी कोकेन आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचे ब्लड सॅम्पलदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. प्रांजल खेवलकर यांना अडकवलं जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि वकिलांनी केला होता. तसेच राजकीयरित्या अडकवण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी हे सगळं प्लॅन केल असल्याचेही वकिलांनी सांगितलं होत. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.