रिक्षाची ज्येष्ठाला धडक; जखमी अवस्थेत झाडीत टाकले, पसार रिक्षाचालकाला दिल्लीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:20 IST2025-12-08T18:18:24+5:302025-12-08T18:20:06+5:30
अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालकाने ज्येष्ठाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती

रिक्षाची ज्येष्ठाला धडक; जखमी अवस्थेत झाडीत टाकले, पसार रिक्षाचालकाला दिल्लीतून अटक
पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची बतावणी करून त्यांना जखमी अवस्थेत खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. बाणेर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून पाच महिन्यांनी पसार झालेल्या रिक्षाचालकाला अटक केली. इसराईल मंगला गुर्जर (२२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकातून २० जुलै रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक निघाले होते. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठाला रिक्षाने धडक दिली होती. अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने ज्येष्ठाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी बतावणी करून नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर ज्येष्ठाला रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून तो तेथून गेला. गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत जखमी अवस्थेतील ज्येष्ठाला सोडून गुर्जर पसार झाला. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलिस ठाण्यात दिली. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह खडकीतील लोहमार्गाजवळ सापडला होता. त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ज्येष्ठ नागरिकाला बालेवाडी फाटा परिसरात रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालकाने त्यांना रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची बतावणी नागरिकांकडे केली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शाेध घेण्यात येत होता. पसार झालेला रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. महिपालपूर परिसरात आठ दिवस रिक्षाचालक गुर्जर याचा शोध घेण्यात आला. त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. गुर्जरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. डाबेराव, रायकर, पोलिस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रीतम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवतिरक यांनी ही कामगिरी केली.