जिल्हा परिषदेसह पंचायत समिती सदस्य पदाकरिता सोमवारी आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:11 IST2025-10-10T10:10:43+5:302025-10-10T10:11:04+5:30
जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीत्यांची आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली

जिल्हा परिषदेसह पंचायत समिती सदस्य पदाकरिता सोमवारी आरक्षण सोडत
पुणे : जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदांकरिता आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोमवारी दुपारी १२:०० वाजता तालुकानिहाय सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीत्यांची आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती - भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता. मावळ, हवेली - उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी. व्ही. जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती - बैठक सभागृह, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड, भोर - अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर, बारामती पंचायत समिती - कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख मोहिते यांनी दिली.