धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 18:12 IST2024-12-22T18:12:31+5:302024-12-22T18:12:49+5:30
मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री मुंडेंना होता

धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी
बारामती : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.
रविवारी (दि २२) उपमुख्यमंत्री पवार बारामतीकरांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमासाठी बारामती दाैऱ्यावर आहेत. यावेळी बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. तसेच मुंडे यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
मराठा बांधव संतोष देशमुख यांचा परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता. त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याने इतर गुंडांमार्फत म्हणजेच वाल्मीक कराड व इतरांमार्फत देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत. म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. या निवेदना सुनील सस्ते,अॅड.विजय तावरे, विकास खोत, सचिन शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, महायुती सरकारचे खातेवाटप शनिवारी संध्याकाळी जाहीर झाले. खातेवाटप जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंविरोधात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अटक व्हावी आणि हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली आहे. मात्र,मुंडे यांच्याविरोधात बारामतीत मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे.