Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:50 IST2024-08-02T17:50:37+5:302024-08-02T17:50:55+5:30
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी युक्तिवाद करण्यात आला होता

Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे : पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुळशी तालुक्यात न जाण्याच्या अटीवर मनोरमा यांना अटी शर्ती वर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात निर्णय झाला. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
‘प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. तिच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म ॲक्ट लागू होत नाही. तिने स्वरक्षणासाठी पिस्तूल वापरले, असा युक्तिवाद वादग्रस्त प्रशिक्षाणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता. दरम्यान, मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकरच्याच अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. आज त्यावर कोर्टाने निर्णय देऊन जामीन मंजूर केला आहे.
सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे ॲड. कुंडलिक चौरे, मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली. व्हिडीओवरून मनोरमा खेडकरने स्वरक्षणासाठी पिस्तूल वापरले असे दिसून येत नाही. व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, व्हिडीओ खरा असल्याचे त्यांच्याकडून कबूल करण्यात येत आहे. न्यायालयीन वाद सुरू असतना जागेच्या ताब्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. कानपट्टीवर पिस्तूल ठेवून गोळी झाडणार होते. मात्र, लोकांनी ओढले, म्हणून वाचलो. अन्यथा तेथेच मृत्यू झाला असता. घटनेच्या वेळी उपस्थित असलेले तिचे अंगरक्षक अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. मोबाइल जप्त करायचा आहे. वादग्रस्त असलेली तिची मुलगी पूजा खेडकर फरार आहे. तिच्याकडून पुराव्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अमेय बलकवडे यांनी केली होती.