सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसासाठी प्रतिटन ३१७३ रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत २८०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असून उर्वरित ३७३ रुपये ३१ मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. एफआरपी मधील २८०० रुपये पहिला हप्ता अदा केल्यानंतर उर्वरित ३७३ रुपयांप्रमाणे ४५ कोटी रुपये सभासदांना मिळणार आहेत. त्यामुळे सभासदांना ऐन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिलासा मिळाला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार (दि. २५) रोजी पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोमेश्वरकडूनही यापुढे एकरकमी एफआरपी देण्यात येणार आहे. जगताप पुढे म्हणाले की, चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक आहे. मार्च अखेर पर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या टाईम ऑफिस मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दोन चौकशी समित्या नेमल्या आहेत. या महिना अखेरपर्यंत चौकशी अहवाल मिळणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुरुषोत्तम जगताप यांनी दिला आहे.
नेहमी सत्याचाच विजय
सोमेश्वर कारखाना व मु सा काकडे महाविद्यालय यांच्यात गेली ३० वर्ष मालकी हक्कावरून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल असून याबाबत बोलताना जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या मालकीचे असलेले मु. सा. काकडे महाविद्यालय हा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या ३० वर्षांपासून महाविद्यालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयात केस सुरु आहे. सर्व सभासदांनी कारखान्याचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवावा. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असून विजय हा नेहमी सत्याचाच होतो. असे सूचक विधान जगताप यांनी केले आहे.