कमी उत्पन्नामुळे पीएमपीच्या मिडी बसला ‘रेड सिग्नल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:01 IST2019-11-07T18:53:17+5:302019-11-07T19:01:47+5:30
पीएमपीकडे २०० हून अधिक मिडी बस आहेत..

कमी उत्पन्नामुळे पीएमपीच्या मिडी बसला ‘रेड सिग्नल’
पुणे : पिंपरी व भोसरी येथील आगारात जागा नसल्याने शेवाळवाडी येथील आगारात २५ ते ३० मिडी बस काही दिवसांपासून पार्किंग करण्यात आल्याचा दावा पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या बसला इतर बसच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याने रेड सिग्नल दिला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भोसरी व पिंपरी आगाराला १२ मीटर लांबीच्या नवीन बस देण्यात आल्याने तसेच तिथे मिडी बस उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने शेवाळवाडी येथे बस आणण्यात आल्या होत्या.
‘पीएमपी’ ताफ्यात बारा मीटर लांबीच्या सुमारे ३७५ नवीन सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी पिंपरी व भोसरी आगारालाही काही बस देण्यात आल्या आहेत. या आगारांमध्ये पुर्वीपासून मिडी बसही आहेत. नवीन बसमधील प्रवाशांची संख्या व त्यातून मिळणारे उत्पन्न मिडी बसपेक्षा जवळपास दुपटीने अधिक आहे. त्यामुळे दोन्ही आगारांमधून प्रामुख्याने नवीन बस मार्गावर आणण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, मिडी बस मार्गावर आणल्या जात नाही. या बस दोन्ही आगारांमध्ये उभ्या करण्यासाठी जागेचीही कमतरता आहे. त्यामुळे शेवाळवाडी येथे २५ ते ३० आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. आमदार चेतन तुपे यांनी ही बाब पुढे आणल्यानंतर यावर प्रकाश पडला आहे. दरम्यान, गुरूवारी या सर्व बस तिथून हलवून भोसरी आगाराकडे पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
पीएमपीकडे २०० हून अधिक मिडी बस आहेत. मागील दोन वर्षांपासून या बस मार्गावर धावत आहेत. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून केवळ जागेचे कारण सांगितले जात असले तरी मिडी बसमुळे मिळणारे कमी उत्पन्न आणि त्यातील काही तांत्रिक दोषांमुळे या बस मार्गावर आणण्यात आल्या नाहीत, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मागील काही दिवसांत मिडी बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढले आहे. तसेच अन्य काही तांत्रिक दोषही निर्माण होत आहेत. या बसबाबत काही वरिष्ठांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. एक ते दीड वर्षाच्या आतच अनेक बसमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊ लागल्याने बसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही या अधिकाºयाने सांगितले.
-------------