Maratha Reservation: पुरंदर तालुक्यात आढळल्या ८ हजार ७२० कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:06 IST2023-11-24T14:02:55+5:302023-11-24T14:06:33+5:30
मराठा कुणबी दाखल्यांसाठी तालुकास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष मोहीम...

Maratha Reservation: पुरंदर तालुक्यात आढळल्या ८ हजार ७२० कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी
सासवड (पुणे) :पुरंदरच्या प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व जुने अभिलेख यांची तपासणी केली जात असून आतापर्यंत तब्बल ८७२० कुणबी मराठा असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये ८९ गावांमधून ४९६९ नोंदी मराठी लिपीतील असून ३ गावांमधून ३७५० नोंदी मोडी लिपीतून आहेत. एकूण ८७२० नोंदी आढळून आल्याची माहिती नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांनी दिली आहे.
मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक पुरावे शोधण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार पुरंदरच्या प्रांताधिकारी अधिकारी वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार विक्रम राजपूत हे सहसचिव असून इतर सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, पोलिस निरीक्षक संतोष जाधव त्याचप्रमाणे भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी दुय्यम निबंधक तसेच सहायक निबंधक यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
८ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यामध्ये जुने अभिलेखातील नोंदी तपासणीबाबत सर्व सदस्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुरंदर तहसीलमध्ये कुणबी जातीच्या नोंदीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असून या मोहिमेसाठी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तहसीलमध्ये तालुक्यातील सर्व कोतवाल, महसूल नायब तहसीलदार व अभिलेखपाल यांच्यामार्फत पुरंदर तालुक्यातील १०३ गावांचे ७/१२ चे जुने अभिलेख तपासण्यात येत आहेत, तसेच तहसीलच्या अभिलेखात उपलब्ध असलेल्या नमुना १४ मधील जुन्या जन्ममृत्यूच्या मोडी भाषेतील नोंदी मोडी भाषातज्ज्ञांच्या सहकार्याने तपासणीची कार्यवाही सुरू आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार पुरंदर तालुक्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदी तपासण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण प्रशासन काम करीत असून आतापर्यंत ८७२० नोंदी आढळून आल्या आहेत. त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील संपूर्ण १०३ गावांमधील जुने नवे अभिलेख तपासून त्यांचा शोध घेण्यात येईल. तालुक्यातील सर्व गावांची माहिती पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरूच ठेवण्यात येईल, अशी माहिती पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली आहे.