पुण्यात प्रशासनाच्या वरदहस्ताने रेडिमिक्स प्लॅंट माफिया राज; प्रयेजासिटी रहिवाशांचा आरोप
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: June 25, 2024 19:25 IST2024-06-25T19:25:11+5:302024-06-25T19:25:29+5:30
रेडीमिक्स मालाच्या ट्रकमुळे सन २०२३ ते २०२४ फेब्रुवारी पर्यंत ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला

पुण्यात प्रशासनाच्या वरदहस्ताने रेडिमिक्स प्लॅंट माफिया राज; प्रयेजासिटी रहिवाशांचा आरोप
पुणे: पुणेकरांनी या अगोदर ड्रग्ज, गुटका, दारु, पब, बार, वाळू , टँकर वगैरे यांचे माफियाराज अनुभवले. याचप्रमाणे सध्या पुण्यात बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राज्यकर्ते व प्रशासनाच्या वरदहस्ताने अनधिकृत आरएमसी (रेडिमिक्स सिमेंट काँक्रिट) प्लॅंट ही नवीन माफिया गॅंग फोफावली असून त्याचा सर्वसामान्यांना त्रास हाेत आहे. पण त्याची दखल काेणीच घेत नाही, असा आराेप सिंहगड रस्त्यावरील प्रयेजासिटी येथे रहिवाशी असलेल्या नागरिकांनी पत्रकार परिषदेत साेमवारी केला.
या रहिवाशांच्या वतीने मनसेचे राज्याचे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी पत्रकार परिषद घेत रहिवाशांच्या व्यथा मांडल्या. यावेळी प्रयेजा सिटीचे अध्यक्ष लाेकेश भावेकर, सचिव राहूल मांडे तसेच येथील रहिवाशी महिला उपस्थित हाेत्या. शहरामध्ये सध्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यांना हे रेडिमिक्स प्लॅंटस काॅंक्रीट माल पुरवताे. येत्या १५ दिवसांत राज्य सरकारकडून व प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व नागरिकांसमवेत मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचाही इशारा यावेळी संभुस यांनी दिला.
या आरएमसी मालाच्या ट्रकमुळे सन २०२३ ते २०२४ फेब्रुवारी पर्यंत ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तसेच १०० ते ११० जणांना गंभीर दुखापत झालेली आहे. बहुतांश आरएमसी ट्रकचालक हे दारु पिऊन मालाची ने-आण करत असतात.
प्रयेजा सिटी, प्रयेजा पर्व, प्रयेजा पर्ल, आर्या रेसिडेन्सी, कल्पवृक्ष, सिरीन काऊंटी आणि परिसरातील सर्व रहिवाशांसाठी सक्षम व सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी वाहतुक पोलीस नियुक्त करावा. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या ट्रकची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी. एमपीसीबी बोर्डाकडे तक्रार केल्यावर बोर्ड फक्त नोटीस देऊन बघ्याची भूमिका घेत असते. मात्र, कारवाई होताना दिसत नाही असाही आराेप या रहिवाशांनी केला.
या सगळ्या यंत्रणेचा जबरदस्त फटका हा त्या भागात राहणाऱ्या कुटूंबांना भोगावा लागतो. या प्लॅंटस्मुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. घरात धुळ येत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार जडले आहेत, त्यामुळे शहरातील हे अनधिकृत प्लॅंट बंद करावेत, अशी मागणी मनसे व रहिवाशांनी केली आहे. यावेळी त्यांनी काही प्लॅंटची नावेही जाहीर केली.