धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:58 IST2025-03-11T13:55:59+5:302025-03-11T13:58:52+5:30
सुरुवातीला आमदारकी, पुन्हा खासदारकी, आता परत मागच्या वर्षी आमदारकी एवढी संधी पक्षाने कधीच कोणाला दिली नव्हती

धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसबाबत कोणतीही नाराजी नाही असे सांगत धंगेकरांनी धनुष्यबाण हाती घेतला. आता या राजकीय घडामोडीनंतर पुण्यात काँग्रेस नेत्यांच्या नाराजीच्या प्रक्रिया समोर आल्या आहेत. माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे. म्हणून ते महायुतीत गेल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले, धंगेकर यांना आमदार होण्याची संधी दिली. त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातनं एकही योजना कधीही आणली नाही. म्हणून त्यांच्यावर जर बोलायला गेलो. तर अनेक गोष्टी बोलता येईल. पण खालच्या थराला उठून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे. ते व्यावसायिक राजकारण आहे. आज त्यांना जे काही त्यांच्याकडं अडीअडचणी येतात. त्यांनी जे दुष्कर्म केलेत. ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे, म्हणून ते गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला, मान दिला गेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही
पोटनिवडणूक आली. ज्यावेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी धंगेकरांना दिला. आम्ही त्यांचं काम केलं. निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली. त्यानंतर खासदारकी दिली आणि आमदारकी परत दिली. म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये चार वेळा संधी दिली जे आत्तापर्यंत कोणालाही दिली नाही. निष्ठावंत कार्यकर्ते त्या भागातले असतील. मुक्तार शेख, कमलताई व्यवहारे असेल. अनेकांनी पक्षाला सांगितलं की, त्यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही. ह्यांना तुम्ही संधी देऊ नका. पहिले ह्यांची परीक्षा होऊद्या. पण पक्षाने त्यांना संधी दिली. ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर किंवा २०१७ ला जरी नगरसेवक होऊन काँग्रेस बरोबर राहिले. पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही. हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली. त्याचा फॉलो अप पुढं केला नाही. याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली होती. जे आंदोलन ते करत आहेत. ते ससूनच्या पाटीलचं ड्रुग्सचा विषय असो, पबच्या विरोधातला असो या कुठंही ह्याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नव्हतं असंहि शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखे होते
अनेक वेळेला त्यांना बोलावलं गेलं. पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एकतरी फोटो आहे का? की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली. मग ते मेट्रोचे आंदोलन असेल. महानगरपालिकेचं असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाचं असेल, राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांनी टीका केली त्याही वेळेला कधी आले नाहीत. त्यांच्या पक्षात, ज्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांनी बॅनर लावले. त्याच्यावर कधी काँग्रेस पक्ष चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते. म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते.
त्यांच्यामुळं पक्षाला फायदाच कधी झाला नाही
रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाराष्ट्रातले अनेक नेते नानाभाऊ पटोले, यशोमती ठाकूर, वड्डेटीवार त्यांनी तर घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीव ओतून काम केलं. आज त्यातली अनेक कार्यकर्ते माझ्याकडं बघतात. त्यांची मी मनापासून माफी मागतो. त्यांच्यामुळं पक्षाला फायदाच कधी झाला नाही हीच तर तक्रार आमची आहे असेहि त्यांनी यावेळी सांगितले आहे.