राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:43 IST2025-10-05T06:43:37+5:302025-10-05T06:43:59+5:30
तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही.

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मराठी माणूस त्यांच्या मागे जाणार नाही, असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शनिवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. आता तरुण मतदार भावनिक होत नाही, तो प्रॅक्टिकल विचार करतो, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते की, ते काँग्रेससोबत कधीही जाणार नाहीत. पण, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धवजींना महागात पडला, असेही कदम म्हणाले.
पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या पत्नी श्रेया कदमही या चर्चेत सहभागी झाल्या. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही राज्यमंत्र्यांसोबत उत्तम समन्वय आहे, असे सांगत कदम यांनी नव्या योजनांची माहिती दिली. त्याच वेळी, ‘खरी शिवसेना आमचीच आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरेंवर टीकाही केली.
शिवसेना एकच !
शिवसेना दुभंगली असे म्हणणे चुकीचे आहे. पक्षाचे नाव व चिन्ह आमच्याकडे आहे. जनतेने शिवसेना म्हणून आमच्यावर विश्वास ठेवला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, ती शिवसैनिकांना मान्य नव्हती. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असा निर्णय कधीच घेतला नसता.