कट्टर राज समर्थक वसंत मोरेंनी धरली भाजप कार्यालयाची वाट; मुरलीधर मोहोळ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:54 IST2022-07-13T14:53:03+5:302022-07-13T14:54:21+5:30
मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतल्याने मनसेत नाराज असलेले वसंत मोरे भाजपत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कट्टर राज समर्थक वसंत मोरेंनी धरली भाजप कार्यालयाची वाट; मुरलीधर मोहोळ म्हणाले...
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले होते. मनसे पक्षातही यावरून दोन गट पडले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला पुण्यातील नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी मोठा विरोध केला होता. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असून, मनसेला जय महाराष्ट्र करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यानंतर आता वसंत मोरे भाजप कार्यालायत गेल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीची माहिती भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे काही फोटो मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन शेयर केले. यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटवर वसंत मोरे भेटीबाबत सांगितले आहे.
वसंत मोरे यांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली
मुरलीधर मोहोळ ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे मित्र आणि मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे छत्रपती शिवरायांचा मेघडंबरी पुतळा देऊन स्वागत केले. राजकीय चौकटीपलिकडे आमची मैत्री गेल्या दीड दशकांपासून अविरत निभावली जात आहे.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणे शक्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आणि शहर मनसे विरुद्ध वसंत मोरे असा संघर्ष सुरू झाला. पक्षाने त्यांच्याकडील शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे सोपवली होती. यानंतर वसंत मोरे नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आपण राजमार्गावरच आहोत, पक्ष सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी जाहीर केले होते. आता मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतल्याने वसंत मोरे भाजपत जाणार का? ही चर्चा रंगू लागली आहे.
माझे मित्र आणि मनसेचे मा. शहराध्यक्ष श्री. @vasantmore88 यांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचं छत्रपती शिवरायांचा मेघडंबरी पुतळा देऊन स्वागत केलं. राजकीय चौकटीपलिकडे आमची मैत्री गेल्या दीड दशकांपासून अविरत निभावली जात आहे. pic.twitter.com/U1NF9uBIYu
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 12, 2022