पुणे: बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे. तरीदेखील त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होत आहे, तर बुधवारी (दि. २४) आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी २६ ते २८ तारखेदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती सानप यांनी दिली. या आठवड्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय राहणार असल्यामुळे मॉन्सूनचा परतीच्या प्रवासाबाबत सध्याच अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे कमी दाबाचे क्षेत्र कमी झाल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मॉन्सूनने सोमवारी (दि. २२) गुजरात, राजस्थान, हरयाना व पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते दिवसांत राज्यात बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
नागरिकांनी काळजी घ्यावी
हवामानाच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. दि. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: सायंकाळी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.