पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस
By श्रीकिशन काळे | Updated: July 9, 2024 19:26 IST2024-07-09T19:26:38+5:302024-07-09T19:26:48+5:30
पुणेकरांवर असणारी पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर होईल, अशी आशा

पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस
पुणे : पुणे परिसरातील धरणांमध्येही सोमवारी (दि.८) चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीमध्ये ३० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (दि.९) मात्र पावसाने दिवसभर विश्रांती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाची कृपा झाली नव्हती. मॉन्सून येऊनही वरूणराजा बरसला नाही. पण सोमवारपासून मॉन्सून सक्रिय झाला असल्याने पावसाचा जोर वाढला आहे. धरणसाठ्यात वाढ न झाल्याने काही दिवसांपासून पुणेकरांवर पाणीकपतीची टांगती तलवार होती. पण आता ती दूर होईल, अशी आशा आहे. धरणक्षेत्रातमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोमवारी काही प्रमाणात रिमझिम असला तरी पाऊस झाला. त्यातून धरणसाठा वाढला आहे.
धरणांत सोमवारी झालेला पाऊस
धरण : पडलेला पाऊस टक्केवारी
टेमघर : ३८ मिमी १७.३०
वरसगाव : ३४ मिमी १७.८६
पानशेत : ३६ मिमी ३०.८५
खडकवासला ३४ मिमी ५४.३९