पुणे : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला आहे. मात्र, सोलापूर अद्यापही चाळीस अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
काही शहरांतील तापमान अंश डिग्री सेल्सिअसमध्ये
पुणे ३८.५, जळगाव ३९, नाशिक, कोल्हापूर ३८.४, सोलापूर ४१., छत्रपती संभाजीनगर ३९.६, परभणी ४०., अमरावती ४१.२, चंद्रपूर ४२.२, नागपूर ४२.२, वर्धा ४१, यवतमाळ ४१.५