दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 18:28 IST2025-05-25T18:24:54+5:302025-05-25T18:28:11+5:30
- स्वामी चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली

दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प
पुणे : दौंड तालुक्यात कालपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसरात पावसाने थैमान घातले असून, स्वामी चिंचोलीजवळ सोलापूर - पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही वाहने पाण्यात अडकून वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिकच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यात ९५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. स्वामी चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. यासंदर्भात तातडीने प्रतिसाद देत गावच्या सरपंच पूनम मदने आणि ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे यांनी तहसीलदार, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावातील काही वाड्यावस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे गावाचा आणि महामार्गाचा संपर्क तुटला आहे.
या परिसरातील फर्निचर्सच्या दुकानाच्या पायर्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "कोणीही घाबरून जाऊ नये, प्रशासनाशी सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. सरपंच पूनम मदने यांनी सांगितले की, गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. गावकऱ्यांचे मल्लिनाथ मठात स्थलांतर केले जात असून, सर्वांनी संयम ठेवावा.अशा सुचनाही दिल्या जात आहे. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, मदतकार्य सुरु आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.