बोपदेव घाटातील लॉजवर छापा; २ बांगलादेशी तरुणी ताब्यात, व्यवस्थापकासह दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:29 IST2025-12-15T18:29:03+5:302025-12-15T18:29:26+5:30
बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून भारतात आणले जात असून त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले जाते.

बोपदेव घाटातील लॉजवर छापा; २ बांगलादेशी तरुणी ताब्यात, व्यवस्थापकासह दोघे अटकेत
पुणे: बांगलादेशी तरुणींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोपदेव घाट परिसरातील एका लाॅजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (४६, रा. येवलेवाडी, कोंढवा) आणि कामगार सचिन प्रकाश काळे (४०) यांना अटक करण्यात आली. कोंढवा पोलिसांचे पथक गस्त घालत होते. बोपदेव घाट परिसरातील एका लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींना देहविक्री करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर लाॅजवर छापा टाकण्यात आला. तेथे दोन बांगलादेशी तरुणी आढळून आल्या. चौकशीत लॉजचा व्यवस्थापक रवी गौडा याने दलालामार्फत या तरूणींना आणल्याची माहिती मिळाली. तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याची माहिती तपासात मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
परिमंडळ पाचच्या प्रभारी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, अरुण कीटे, सुषमा हिंगमिरे, सोनाली कांबळे, राहुल रासगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना भारतात आणण्यात येते. त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले जाते. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींना बांगलादेशातील दलालांनी किरकोळ पैसे देऊन भारतात आणले. त्यादृष्टीने कोंढवा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत छापा टाकून पोलिसांनी बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते.