राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:55 IST2025-05-10T10:53:58+5:302025-05-10T10:55:55+5:30
गेल्या अनेक तारखांना राहुल गांधी यांनी दोषारोपपत्रावर विवेचन करणे टाळले आहे

राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा जामीन रद्द करावा असा अर्ज सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. गेल्या अनेक तारखांना राहुल गांधी यांनी दोषारोपपत्रावर विवेचन करणे टाळले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एमपी एमएलए विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी हा खटला दाखल करताना सावरकर यांनी लिहिलेले 'माझी जन्मठेप' हे पुस्तक तसेच एक पेन ड्राईव्ह व काही वर्तमानपत्रांची कात्रणं न्यायालयात दाखल केली. मात्र, या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळाल्या नाहीत. ही सर्व कागदपत्रे व माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला होता. त्यानुसार सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी शुक्रवारी बचाव पक्षाला "हिंदुत्व" आणि 'माझी जन्मठेप' या दोन पुस्तकांच्या प्रती दिल्या. मात्र ' माझी जन्मठेप" हे पुस्तक इंग्रजीमध्ये मिळावे असा अर्ज गांधी यांचे वकील ॲड. पवार यांनी केला आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी दि. २८ मे रोजी होणार आहे.