बूथ कमिट्यांच्या पत्राची राहुल गांधींनी घेतली दखल; पत्रात व्यक्त केली पाठिंब्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:37 IST2025-08-13T19:37:12+5:302025-08-13T19:37:49+5:30

पक्षाच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन त्यांनी अनेक वर्षे सांभाळले.

Rahul Gandhi took note of the booth committees' letter; expressed his support in the letter | बूथ कमिट्यांच्या पत्राची राहुल गांधींनी घेतली दखल; पत्रात व्यक्त केली पाठिंब्याची भावना

बूथ कमिट्यांच्या पत्राची राहुल गांधींनी घेतली दखल; पत्रात व्यक्त केली पाठिंब्याची भावना

पुणे : निवडणुकीतील बॅलेट पेपर व बूथ कमिट्यांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे यांनी पाठवलेल्या पत्राची दखल पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली. त्यांनी पाटोळे यांना पत्र पाठवून पाठिंबा तर दर्शवला आहेच, शिवाय डट के रहना, असे आवाहनही केले आहे.

पाटोळे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आहेत. वय ८० पेक्षा जास्त असलेले पाटोळे जुन्या पिढीतील समाजवादी कार्यकर्ते आहेत. एस. एम. जोशी यांचे ते स्विय सहायक होते. ना.ग. गोरे, भाई वैद्य या समाजवादी नेत्यांचा निकटचा सहवास त्यांना मिळाला. पुढे ते काँग्रेसमध्ये आले त्यालाही आता अनेक वर्षे झाली. पक्षाच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एका पुणे दौऱ्यात पाटोळे यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या मतदान केंद्रनिहाय समित्या, त्यावरचे कार्यकर्ते यांची रचना याचे कौतुक केले होते.

सध्या सुरू असलेल्या निवडणूक आयोग व राहुल गांधी यांच्यातील वादविषयाच्या संबंधाने पाटोळे यांनी राहुल यांना एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची राहुल यांची मागणी योग्य असल्याचे सांगून त्यासाठी राहुल यांच्याबरोबरच पक्षानेही आग्रही राहायला हवे, असे मत व्यक्त केले आहे. पत्रामध्ये पाटोळे यांनी बूथनिहाय रचनेची माहितीही राहुल यांना दिली आहे. लोकशाहीवरचा भारतीय नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर प्रत्येक लहान-मोठी निवडणूक पारदर्शकच झाली पाहिजे व त्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान हाच योग्य पर्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

विशेष असे की, राहुल यांनी या पत्राची त्यांच्या व्यस्त दिनक्रमातही दखल घेतली. पाटोळे यांना त्यांनी पत्र पाठवले आहे. तुमच्या सूचनांचा मी आदर करतो. त्या सूचना पक्षाच्या संबंधित समितीकडे पाठवल्या असून, तिथे त्या विचारात घेतल्या जातील असे राहुल यांनी म्हटले आहे. भविष्यातही तुमचे असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला आहे. पाटोळे यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा नेता मोठा वाटतो; पण राहुल गांधी खरोखरच मोठे नेते आहेत हे त्यांनी माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या पत्राची दखल घेऊन सिद्ध केले आहे.

Web Title: Rahul Gandhi took note of the booth committees' letter; expressed his support in the letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.