राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:30 IST2025-04-09T16:25:40+5:302025-04-09T16:30:21+5:30

दीनानाथच्या केळकरांसारखे वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील

Rahu Ketu do not affect humans Anti Superstition Movement objects to dr dhananjay Kelkar claim | राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप

राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप

पुणे: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात १० लाख मागितल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर डॉ घैसास यांच्यावर टीकाही झाली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. डिपॉझिटच्या या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने डिपॉझिट हि पॉलिसी मागील आठवड्यात रद्द केली. त्यावरून आज पुन्हा दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर यांनी मत व्यक्त केलं आहे. आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं.  पण त्यादिवशी राहू केतू डोक्यात काय आलं आणि या लोकांनी डिपॉझिट लिहून दिलं काय माहित नाही. अशी प्रतिक्रिया केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावरून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे विशाल विमल यांनी केळकरांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. असा अशास्त्रीय दावा केल्याससंबंधी डॉ. धनंजय केळकर डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कोणताही शास्त्रीय आणि व्यवहारिक आधार नसलेल्या ज्योतिषात राहू, केतू हे दोन ग्रह मानले आहेत. मात्र खगोलशास्त्रामध्ये राहू, केतूला ग्रह म्हणून मान्यता नाही. आणि खरे तर कोणतेही ग्रह हे पृथ्वीवरील मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, हे शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट झालेले आहे. रुग्णालयाचे जबाबदार म्हणून डॉ. धनंजय केळकर यांनी केलेला दावा हा डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून माहिती घेऊनच केलेला असणार आहे. त्यामुळे विज्ञान शाखेचे असणारे डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांना ग्रहांसंबंधी शास्त्रीय माहिती नसणे हे अत्यंत धक्कादायक असल्याचे ते म्हणाले आहेत.  

शनी, मंगळ, राहू,केतूला शिक्षा ठोठावायची का?

स्वतःच्या चुकांची जबाबदारी झटकून त्या चुका राहू आणि केतूच्या माथी मारणे, यामागे चालूगिरी, कावेबाजपणा आणि धूर्तपणा आहे. भविष्यात एखाद्या रुग्णावर निदान, उपचार करत असताना रुग्णालय आणि डॉक्टरांकडून एखाद्या रुग्णावर विपरीत परिणाम झाले अथवा एखादा रुग्ण दगावला तर हे रुग्णालय आणि डॉक्टर हे सदर गोष्ट ही शनी, मंगळ अथवा राहू, केतूमुळे घडल्याचे सांगून हात वर करणार असल्याचे दिसते. आणि मग सदर चुकीसंबंधी न्यायालयाने नक्की शनी, मंगळ, राहू,केतूला शिक्षा ठोठावायची का? असा प्रश्न पडतो.  डॉ. धनंजय केळकर यांनी केलेल्या बेकायदेशीर अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे समर्थन घडले आहे. उद्या वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील. त्यामुळे असा अशास्त्रीय दावा केल्याससंबंधी डॉ. धनंजय केळकर डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.

Web Title: Rahu Ketu do not affect humans Anti Superstition Movement objects to dr dhananjay Kelkar claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.