महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 17:50 IST2021-05-13T17:50:32+5:302021-05-13T17:50:38+5:30
सरकारी कामात आणला अडथळा

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक
पुणे: विनामास्क दुचाकीवर बसून प्रवास करत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असताना गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका महिला पोलीस अधिकार्याला दोघांनी धक्काबुक्की केली.
अॅन्थोनी सेबस्टिसन डिलिमा (वय ६९) आणि अलिशा अॅन्थोनी डिलिमा (वय ३२, दोघे रा. घोरपडी) यांनी खडकी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार विद्या पोखरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास आंबेडकर चौक औंध बोपोडी परिसरात घडली.
पोखरकर व महिला सहायक पोलीस निरीक्षक खडकीतील डॉ, आंबेडकर चौकात विनामास्क नागरिकांवर कारवाई करत होते. यावेळी दुचाकीवरुन डिलिमा बापलेकी आल्या. पोखरकर यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी न थांबता पोखरकर यांच्या पायावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे बसलेल्या अलिशा हिला मास्कबाबत विचारणा केल्यावर तिने तू मास्क विचारणा करणारी कोण आहे. तुझी नोकरीच घालवते, अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार सुर असताना सहायक पोलीस निरीक्षकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.